Marathi Kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी - कुसुमाग्रज



समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||
 
घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||
 
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||
 
करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||
 
पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||
 
भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||
 
जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||
- कविवर्य कुसुमाग्रज

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

सुख- ग.दि.मा


एका वटवृक्षाखाली,बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती,अनुभव आणि ज्ञान
एक वये वाढलेले,एक पिलू चिमुकले
वृध्द-बालकात होते,काही भाषण चालले.

कोणाठायी सापडले तुला जीवनात सुख?
वृध्द बालका विचारी,त्याचे चाटुनिया मुख.

मला वाटते आजोबा,सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी,त्यास धराया मुखात
माझ्या जवळी असून,नाही मज गवसत
उगाचच राहतो मी,माझ्या भोवंती फिरत

अजाण त्या बालकाची,सौख्य कल्पना ऐकून,
क्षणभरी वृध्द श्वान,बसे लोचन मिटून.

कोणाठायी आढळले तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडील,श्वान संघाचे नायक!

बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर -
तुझे बोलणे बालका,बिनचूक बरोबर -
परि शहाण्या श्वानाने,लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते,त्याचे कपाळी शेवटी.

घास तुकडा शोधावा,वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग.

ग.दि.मा

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

मी बरसलो आज शब्दांतुन- कविता

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले 
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी. 

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी. 

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी. 

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या 
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी. 

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी. 

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी 
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी. 

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी. 

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी. 

- Unknown. कवी माहीत असेल कळवा

शनिवार, २८ जून, २०१४

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी, संगीतकार : सलील कुळकर्णी

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी- मंगेश पाडगांवकर


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

अशीच यावी वेळ एकदा


अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले


कवी - प्रसाद कुलकर्णी

शुक्रवार, २९ जून, २०१२

फटके- अनंत फंदी

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको

नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको

मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको

सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको

-----अनंत फंदी
 

शुक्रवार, ८ जून, २०१२

भाऊसाहेब पाटणकर - एक जिंदादिल शायर

सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे....
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
संमानितो हासू तसे या आसवा सम्मानितो....
जाणतो अंति अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे...
मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे ....
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे ...

मंगळवार, २२ मे, २०१२

गाभारा -- कुसुमाग्रज


दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

- कुसुमाग्रज

गुरुवार, १० मे, २०१२

जपानी माणसाची एक सुंदर कविता



"जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय.. 
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय.. 
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय.. 
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही 
त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय.. 
ज्या वेळी माझे भाऊ थकलेत, पाय थकलेत, हात थकलेत, शरीर थकलय... 
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय 
त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय.. तो "स्टार" मला गाठाचय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय.. 
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही थांबा घ्यायचा नाही.. 
माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असल पाहिजे.....

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं - मंगेश पाडगांवकर

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !
सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !
आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !
झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !
इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
- मंगेश पाडगांवकर

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

सरणार कधी - कुसुमाग्रज


सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी
लतादींच्या स्वरात ऐका
- कुसुमाग्रज

गुरुवार, ५ एप्रिल, २०१२

कविता

जगण्यावर प्रेम करीत ज्याला जगता येतं
तिच्या डोळ्यात त्यालाच फक्त्त आभाळ बघता येतं

काळजात काटा रुतूनही सूर जवळ असतो
फुलाकडे त्यालाच फक्त्त गाणं मागता येतं

आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो
हे कळतं त्यालाच फक्त्त आतून जागता येतं

ज्याच्या आजच्या खांद्यावर कालची ओझी नसतातं
बोकडकांदा होऊन त्यालाच फक्त्त रांगता येतं

डोळ्यांनीच ज्याला खोल विश्वास देता येतो
न सांगता त्यालाच फक्त्त सगळं सांगता येतं

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

शनिवार, २४ मार्च, २०१२

तहान - म. म. देशपांडे.


सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान सारी मने कळों यावी,
 असा लागावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी ।।

सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती,
यावी लावता कपाळी भक्तीभावाने माती ।।

फक्त मोठी असो छाती सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ माझा शेवटला श्वास
मना मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास ।।

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

निर्धार - श्री. कविवर्य कुसुमाग्रज


समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

गंध फुलांचा

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मीलन

सहज एकदा जाता जाता मिळुनि हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून

विरह संपता, मिलनाची अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन
-- पी सावळाराम

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

समिधा- कुसुमाग्रज (मराठी कविता)

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"

सोमवार, ६ जून, २०११