माझे लेखन- राहुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझे लेखन- राहुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

जुन्या लिखाणातून - रा. म. शे.

परिस्थिती अन काळाच्या तडाख्यात तावून-सुलाखून निघालेल्या नात्यातील ऋणानुबंध सदैव टिकून राहतात आणि क्षणोक्षणिक वृद्धिंगत होत जातात. 

क्षणिक सोयीसाठी कोणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा आत्मसन्मान आणि स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव सांभाळण जमायला हवं.
- 

No one can run away from their past, from the memories that make you happy or sad! -
   

इंद्रधनुष्य तयार व्हायला सुर्याकिरणांचा निसर्गातील अनेक गोष्टींचा मेळ जुळून यावा लागतो, असाच मेळ जीवनात जमायला हवा- सर्व रंग अनुभवण्यासाठी !! सगळ्यांच्या आयुष्यात या मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा असतातच. एवढचं की काही गडद तर काही पुसट असतात. 

- रा. म. शे.  

सोमवार, ४ जुलै, २०१६

तिच्या सोबत...-राहुल

अजूनही तिची आठवण आली की मनाच्या भूमीवर प्रकाश निर्माण होतो...
ती सोबत नसली कि मात्र त्याच ठीकाणी अंधाराच अस्तित्व घर करू लागायचं. तिच्या नसण्याच्या जाणीवेनं तो अंधार अधिकाधिक गडद होत जायचा...
तिचं सोबत असण मनाला एका वेगळ्या उंचीवर घेवून जायचं. ते नात व्यक्त करायला पावित्र्य, निर्माल्य, हे शब्दसुद्धा कमी पडतात.
तिच्या केवळ सानिध्यात राहण्यानं सगळ आपोआप मिळायचं- आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, मैत्र!
तिच्या सानिध्यात माझ्यातला बुद्ध कधी जागृत व्हायचा कळायचंचं नाही.......

"ती परभणीची लायब्ररी!"
-राहुल

Photos: Central Library, Marathwada Agricultural University (MAU renamed as VNMKV), Parbhani, Maharashtra, India

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

टोकियो सफर - राहुल

जपानमध्ये वर्षभरात मिळणाऱ्या सरकारी सुट्ट्या तशा फार कमी (भारताच्या तुलनेत) असतात. आपल्याकडे जसा पितृ-पंधरवडा असतो, तसच काहीसं "ओबोन ओमात्सुरी" नावाने साजरा करतात. स्वतच्या पूर्वजांच्या गावी जाऊन त्यांची पूजा केली जाते.



याच सुट्टीच निमित्त साधून मागच्या आठवड्यात टोकियोला फिरायला गेलो होतो. जपानमध्ये येवून आता ५ वं वर्ष चालू आहे, पण टोकियो पाहण्याचा योग अगोदर कधी आला नव्हता. मित्रांसोबत फिरताना खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतीय दुतावासात झेंडा-वंदनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. योगायोग असा की त्याच दिवशी यासुकुनी श्राईन (जे भारतीय दुतावासाच्या अगदी जवळ आहे) परिसरात खूप गर्दी होती. नंतर लक्षात आलं की- याच दिवशी जपानने दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती पत्करली होती !! जपानमध्ये भारतीय लोकांची कमी नाही पण बहुतांश लोकं टोकियो-परिसरात राहतात. सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना गावी शाळेत असताना केलेल्या गोष्टींची खूप आठवण आली.  


जपानमध्ये फिरताना जागोजागी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची मूर्ती पाहायला मिळते. त्यामागची कथा मात्र टोकियोमध्ये फिरताना पूर्णतः समजली (http://en.wikipedia.org/wiki/Jiz%C5%8D). या मूर्त्यांना बौद्ध धर्मात क्षितीगर्भ (म्हणजेच बोधिसत्व) आणि जपानमध्ये ओ-जीझो-सामा या नावाने संबोधल जाते. अनाकलनीय भीती आणि शंकांवर मात करण्यासाठी आधाराच्या शोधात जगाच्या पाठीवर सगळेच असतात! 


जगात सतत धावणाऱ्या शहरांपैकी एक असलेले टोकियो शहर सार्वजनिक सुट्ट्या असूनही सुट्टीवर नव्हत!!

-
राहुल 


गुरुवार, १ मे, २०१४

अर्धवट स्वप्नांचा प्रवास

स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळायला योग्य वेळ यावी लागते, अन अशी वेळ जेव्हा येते ना, त्यावेळी कधी-कधी विश्वासच बसत नाही. आपण असेही वागू शकतो-हे पचनी पडायला वेळ द्यावा लागतो. अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात अनेक बदल होत असतात.

हरवलेल्या अन पुन्हा कधीही न सापडणाऱ्या काही स्वप्नांना आणि नात्यांना मन सतत आठवत असतं. माहित असतं कि आता काहीही परतून येणार नाहीये. या व्यवहारी आणि मायावी जगात देव (पावित्र्य) आणि देवत्व सांभाळण जितकं कठीण आहे, त्याहून अशा आठवणीतल्या नात्यांना (मन हलकं कराव म्हणून) उजाळा देताना योग्य व्यक्ती भेटणं महाकठीण आहे. देवतुल्य गुरुजन, जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, गावाकडे शाळेत असताना आजी-आजोबांचा जिव्हाळा....... 
ह्या आठवणी जीवन जगताना खूप प्रेरणा देतात. मनाला एक अकल्पित शक्ती आणि स्फूर्ती देत असतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्नं काही काळ मनाला छळणारचं!!! पण म्हणतातना- काळ हा सगळ्या जखमांवरील जालिम उपाय आहे. जसा-जसा काळ पुढे सरकतो, तसं अर्धवट छळणाऱ्या सुरवंठरूपी स्वनांचं बळ देणाऱ्या (विविध रंगाच्या छटा असणाऱ्या) फुलपाखरांरूपी आठवणींमध्ये रुपांतर होत असतं!! अर्धवट स्वप्नांचा असा होणारा प्रवास निश्चितच फार सुखकर असा नसतो...पण तो तसाच व्हायला हवा. वि. स. खांडेकरांच्या "अमृतवेल" कादंबरीतील तो परिच्छेद हाच समर्पक उपदेश देणारा आहे.
-
राहुल



बुधवार, २५ एप्रिल, २०१२

जपान, भूकंप आणि आपण...

जपानमधील भूकंप, सुनामी आणि किरणोत्सार संकट- आपण काय शिकणार? 
जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश! जगातील सगळ्यात मोठे महानगर, म्हणजेच टोकियो या शहरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त तर आहेच पण जपानी संस्कृतीच्या खाणाखुणाही शहरात जागोजागी पाहायला मिळतात. अशा अनेक बाबीमुळे जपान हा आशिया खंडात असूनही इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे वाटते. या राष्ट्राला असलेला शाप म्हणजे जिवंत ज्वालामुखी अन् सतत होणारे भूकंप होय. ११ मार्च २०११ रोजी जपानी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी उत्तरपूर्व जपान इतिहासातील नोंदला गेलेला सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला.
किनाऱ्यापासून सुमारे १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ९.० रिश्टर शक्तीच्या भूकंपामुळे ३३ फुटाहून अधिक उंचीच्या सुनामीच्या लाटा अर्ध्या तासातच किनाऱ्यावर येऊन धडकल्या. किनारपट्टीपासून सरासरी ५-१० किमी आतपर्यंत घुसलेल्या या लाटांमुळे अतोनात नुकसान झाले. भूकंप आणि पाठोपाठ सुनामीच्या लाटा यामुळे अणुउर्जा प्रकल्पावर विपरीत परिणाम झाला. इंधन रॉड थंड ठेवण्यासाठी कार्यरत असणारी शीतकरण प्रणाली बंद पडल्यामुळे काही प्रमाणात किरणोत्सारही झालेला आहे आणि अजूनही हे संकट पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही. भूकंप आणि सुनामीत मृतांचा आकडा १३,००० पेक्षाही जास्त आहे आणि   घटनेनंतर एक महिन्यानंतरही १४,००० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत.
नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा परिणाम हा गरिबांवर होत असतो. हीच बाब देशांसाठीही लागू पडते असे म्हणावं लागेल. जपानसारख्या श्रीमंत देशाला भूकंपात झालेली हानी भरून काढण हे प्रगतीशील राष्ट्रांपेक्षा निश्चित अवघड नाही. या सगळ्या घटनांमधून आपल्यालाही बरेच काही घेता येण्यासारखे आहे. भारतातील  सगळी महानगरे कमी-अधिक प्रमाणात भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. सुनामीने उध्वस्त झालेल्या भागात कुठेही लुटमारीची घटना घडली नाही. सगळेजण संयमाने परिस्थितीचा सामना करत होते. टीवीवर भूकंपग्रस्त भागातील दाखवत असलेल्या एका दृश्यात एका दुकानामालक जिवंत आहे की नाही हे माहित नसतानाही दुकानात येणारे लोकं पैशे ठेऊनच मालं घेत होते. हे दृश्य पाहिल्यावर प्रथमतः १९९३ साली झालेल्या भूकंपाची तीव्रतेने आठवण झाली. आपल्या प्रशासनातील काही लोकं मदत करण्यात गुंतले होते तर काही मेलेल्या लोकांना लुबाडण्यात! जपानी लोकांच्या नसानसात भिनलेली शिस्त, नैतिक मूल्ये त्यांच्याबद्दल बरंच काही सांगून जातात अन् आपल्याला हे नक्कीच शिकण्यासारख आहे.
फक्त भूकंपामुळे झालेले नुकसान-
भूकंप आणि अर्ध्या तासातच सुनामी यात फक्त भूकंपामुळे झालेले नुकसान कोणत्याही सरकारी अथवा इतर एनजीओनां सांगण अवघड आहे. पण सुरवातीला सुनामीअगोदर दाखवत असलेल्या किवा सुनामीच्या दृश्यांमध्येही आपण पाहिले असेल की त्या भागातील इमारतींची पडझड झालेली नव्हती. मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये आजही काही इमारती कुठल्याही नैसर्गिक आपत्तीशिवाय जमीनदोस्त होत असतात!!  
राष्ट्रीय राजकारण-
या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारच्या टीका करून मतांचे राजकारण करण्यापेक्षा अगोदर सरकारला विरोधक मदतीला धावले! आपल्याकडे असे शहाणपण सत्तेत नसलेल्या पार्टीकडून क्वचितच पहायला मिळते.
डॉ. वसंत बापट यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केलेली एक बाब खरच विचार करण्यासारखी आहे की आपल्या देशात संकटानंतर राबविण्यात येणाऱ्या योजना भरपूर आहेत. पण संकटाचा सामना करण्यासाठी जनजागृतीही तितकीच महत्वाची आहे. जपानमध्ये शालेय जीवनापासूनच प्रत्येकाला अशा संकटांचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रसारमाध्यमांचा प्रतिसाद-
यासंदर्भात काही चुकीच्या बातम्या व माहिती सांगितली गेली व जात होती. त्यामुळे अविज्ञानाचा प्रसार होतो आहे याची जाणीव आपल्याकडील प्रसारमाध्यमांनी नेहमी ठेवली पाहिजे. यात पहिली गोष्ट म्हणजे ‘सुनामीमुळे आग लागली,’ असे सांगितले जात होते व आगीची दृश्ये दाखविली जात होती. काही प्रसारमाध्यमे टीआरपी वाढवण्यासाठी महाभारतातील ‘’नरोवा कुंजरोवा’’ अशा भाषेत बातम्या दाखवत असतात. पण अशा बातम्यांमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून जैतापूरसारख्या अत्यावश्यक प्रकल्पांबाबत विरोधाभास निर्माण होतो आहे.


अजून बरेच काही नमूद करण्यासारख आहे...तूर्तास एवढच...

-
राहुल

स्वर्ग- राहुल


नको मला हा मृगजळासारखा आभासी अवास्तव स्वर्ग,
आता सवय झाली आहे सुन्न रात्रींची अन् भक्कास दिवसांची...
नको पुन्हा ते फसव्या नात्यांचे श्वास गुदमरवणारे फास,
अन् त्यात स्वत्व गमावून पुनःपुन्हा गुरफटत जाणे...
राहू द्या मला नरकरूपी धगधगणाऱ्या पण लखलखत्या सत्यात,
तिथे ना काही गमावण्याची भीती आहे, ना विश्वासघात...
-
राहुल

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

Right thing at wrong time is also wrong!

जपानमध्ये आल्यानंतर सुरवातीला देव, धर्माच्या संकल्पना, भारतीय समाजव्यवस्था - हे आणि असले अनेक विचार मनाची शांतता भंग करून नेहमी अस्वस्थ करत होते. बहुतेक सभोवताली असलेल्या वातावरणामुळे, वारंवार होणाऱ्या चर्चांमुळे याचा त्रास जास्तच जाणवायचा. या सगळ्या संकल्पनाबाबतीत माझे स्वतःचे असे मुलभूत आणि भक्कम विचार आहेत. या बाबतीत मनुष्यप्राण्याला नेहमीच कुतूहल आणि ओढ राहिलेली आहे. विचार केला तर जे काही अज्ञात आहे, मानवाच्या बुद्धीला आव्हानात्मक आहे अशा गोष्टींत प्रत्येकाला स्वारस्य असते! पण हळूहळू जाणवत गेलं की यावर विचार करून, चर्चा करून काय साध्य होणार आहे... आणि खरचं असल्या चर्चा करण्याची ही वेळ आहे का... बराच काळ केलेल्या विचारांती मनानं कौल दिला की- नाही. Right thing at wrong time is also wrong! This is gradual and lifetime process of the self-realization and something that you can not find outside of yourself... राहुल

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

ध्यास

स्वतःसाठी ठरवलेल्या बऱ्याच मर्यादा ओलांडून जग पाहण्याचा ध्यास-ही आस वारंवार आचार आणि विचार यांच्यावर मात करून मनाचे लगाम आपल्या ताब्यात घेत असते! पण अशा घटना पुनःपुन्हा घडणे म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. कारण अशा वागण्यामुळे आप्तस्वकीयांच्या मनात आणि समाजात आपल्या प्रती असलेल्या छबीला विश्वासाची किनार देता येत नाही किंवा ते गोंधळून तरी जातात!
पण एक मात्र आहे की जीवनसंग्रामाचे काही नवीन पैलू पहायला, अनुभवायला मिळतात! मग यातील महत्वाची गोष्ट कोणती? स्वतःची समाजातील छबी की जीवनसंग्रामाचे काही नवीन पैलू अनुभवणं? ठरवणं अवघड आहे...
-राहुल

सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

काही माझ्या चारोळ्या २ - राहुल

आज चंद्रावरील डाग
जरा जास्तच स्पष्ट दिसत आहेत
पण असं का वाटतयं
ते माझ्याकडेच बघून हसत आहेत.- राहुल

व्यवहाराच्या दगडी पायरीवर
आता स्थिर राहील पाहिजे
तुजी वाट पाहता पाहता
तुज्याशिवाय जगलं पाहिजे. -राहुल

तु आपल सहज म्हणून
काहींही बोलत असतेस
पण इकडे संपूर्ण भावविश्व
ढवळून टाकत असतेस. -राहुल

का कुणास ठाऊक?
पण आता मन खूप घाबरतं;
कोण माझ न् कोण परंकं
या घोळात गांगरत.-राहुल

कुणी कधी माझं असणं, तर कधी नसणं
खरच मला काही कळतच नाही
कधी-कधी कळत सगळ पण...
या वेड्या मनाला वळतच नाही. -राहुल

माणसान अलिप्त राहणं
जीवनात शिकल पाहिजे,
मोहाचे पाश तोडून
जीवन जगल पाहिजे.-राहुल

काही माझ्या चारोळ्या - राहुल


फोटो: ओझर (गणपती)


नियती! यावर "मृत्युंजय" या कादंबरीत बरंच सविस्तर लिहिलेलं आहे. मनात सजवलेली स्वप्नं कधी-कधी अचानक उद्वस्त होतात. अन् असेही काही क्षण येतात की आपण जे घडतंय ते पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.
काही कळण्याआधीच
झाला चुराडा स्वप्नांचा
समझला ना कधी
हा खेळ भावनांचा. -राहुल


आंतरजातीय विवाहाबद्दल विचार केला तर अजूनही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समाजाचा दृष्टीकोन फारसा बदललेला नाही. अशा पद्धतीन विवाह करणाऱ्या लोकांसमोर अडचणींचे डोंगर उभे राहतात. जातीतील लोकही जवळ करत नाहीत. सगे-सोयरे दुरावले जातात. अशा वेळी एकमेकांशिवाय जगात, भावविश्वात कोणीही आधार देणार नसतं. म्हणूनच असे काही करण्याअगोदर खालील चारोळीत मांडलेला विचार नक्कीच विचार करण्यासारखा आहे...
तुझी माझ्याबद्दलची ओढ मी समजतो
पण मी तरी काय करणार
समाजबंधने झुगारून देताही येतील..
पण ही धुंदी आयुष्यभर नाही पुरणार!- राहुल

या चारोळीसाठी स्पष्टीकरणाची काही गरज नसावी....
तुझं निखळ हास्य
बरंच काही सांगून जातं
माझ्या जीवाला एक
अनामिक हुरहूर लावून जातं. - राहुल

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

एक कविता माझी -आठवणी राहुल

वाटलं नव्हतं तू अशी सोडून जाशील
अन् जाताना तुज्या आठवणी
माझ्या मनाच्या दारात सोडून जाशील.

जाणारच आहेस तर जा
पण तुझ्या आठवणींना पण घेऊन जा.

कारण तू नसलीस ना
त्या मला खूप छळतील गं.
कसं सांगू तुला मी
त्या मला जिवंत जाळतील गं.