गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं - मंगेश पाडगांवकर

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !
सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !
आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !
झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !
इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
- मंगेश पाडगांवकर

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

जपान, भूकंप आणि आपण...

जपानमधील भूकंप, सुनामी आणि किरणोत्सार संकट- आपण काय शिकणार? 
जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश! जगातील सगळ्यात मोठे महानगर, म्हणजेच टोकियो या शहरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त तर आहेच पण जपानी संस्कृतीच्या खाणाखुणाही शहरात जागोजागी पाहायला मिळतात. अशा अनेक बाबीमुळे जपान हा आशिया खंडात असूनही इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे वाटते. या राष्ट्राला असलेला शाप म्हणजे जिवंत ज्वालामुखी अन् सतत होणारे भूकंप होय. ११ मार्च २०११ रोजी जपानी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी उत्तरपूर्व जपान इतिहासातील नोंदला गेलेला सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला.
किनाऱ्यापासून सुमारे १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ९.० रिश्टर शक्तीच्या भूकंपामुळे ३३ फुटाहून अधिक उंचीच्या सुनामीच्या लाटा अर्ध्या तासातच किनाऱ्यावर येऊन धडकल्या. किनारपट्टीपासून सरासरी ५-१० किमी आतपर्यंत घुसलेल्या या लाटांमुळे अतोनात नुकसान झाले. भूकंप आणि पाठोपाठ सुनामीच्या लाटा यामुळे अणुउर्जा प्रकल्पावर विपरीत परिणाम झाला. इंधन रॉड थंड ठेवण्यासाठी कार्यरत असणारी शीतकरण प्रणाली बंद पडल्यामुळे काही प्रमाणात किरणोत्सारही झालेला आहे आणि अजूनही हे संकट पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही. भूकंप आणि सुनामीत मृतांचा आकडा १३,००० पेक्षाही जास्त आहे आणि   घटनेनंतर एक महिन्यानंतरही १४,००० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत.
नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा परिणाम हा गरिबांवर होत असतो. हीच बाब देशांसाठीही लागू पडते असे म्हणावं लागेल. जपानसारख्या श्रीमंत देशाला भूकंपात झालेली हानी भरून काढण हे प्रगतीशील राष्ट्रांपेक्षा निश्चित अवघड नाही. या सगळ्या घटनांमधून आपल्यालाही बरेच काही घेता येण्यासारखे आहे. भारतातील  सगळी महानगरे कमी-अधिक प्रमाणात भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. सुनामीने उध्वस्त झालेल्या भागात कुठेही लुटमारीची घटना घडली नाही. सगळेजण संयमाने परिस्थितीचा सामना करत होते. टीवीवर भूकंपग्रस्त भागातील दाखवत असलेल्या एका दृश्यात एका दुकानामालक जिवंत आहे की नाही हे माहित नसतानाही दुकानात येणारे लोकं पैशे ठेऊनच मालं घेत होते. हे दृश्य पाहिल्यावर प्रथमतः १९९३ साली झालेल्या भूकंपाची तीव्रतेने आठवण झाली. आपल्या प्रशासनातील काही लोकं मदत करण्यात गुंतले होते तर काही मेलेल्या लोकांना लुबाडण्यात! जपानी लोकांच्या नसानसात भिनलेली शिस्त, नैतिक मूल्ये त्यांच्याबद्दल बरंच काही सांगून जातात अन् आपल्याला हे नक्कीच शिकण्यासारख आहे.
फक्त भूकंपामुळे झालेले नुकसान-
भूकंप आणि अर्ध्या तासातच सुनामी यात फक्त भूकंपामुळे झालेले नुकसान कोणत्याही सरकारी अथवा इतर एनजीओनां सांगण अवघड आहे. पण सुरवातीला सुनामीअगोदर दाखवत असलेल्या किवा सुनामीच्या दृश्यांमध्येही आपण पाहिले असेल की त्या भागातील इमारतींची पडझड झालेली नव्हती. मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये आजही काही इमारती कुठल्याही नैसर्गिक आपत्तीशिवाय जमीनदोस्त होत असतात!!  
राष्ट्रीय राजकारण-
या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारच्या टीका करून मतांचे राजकारण करण्यापेक्षा अगोदर सरकारला विरोधक मदतीला धावले! आपल्याकडे असे शहाणपण सत्तेत नसलेल्या पार्टीकडून क्वचितच पहायला मिळते.
डॉ. वसंत बापट यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केलेली एक बाब खरच विचार करण्यासारखी आहे की आपल्या देशात संकटानंतर राबविण्यात येणाऱ्या योजना भरपूर आहेत. पण संकटाचा सामना करण्यासाठी जनजागृतीही तितकीच महत्वाची आहे. जपानमध्ये शालेय जीवनापासूनच प्रत्येकाला अशा संकटांचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रसारमाध्यमांचा प्रतिसाद-
यासंदर्भात काही चुकीच्या बातम्या व माहिती सांगितली गेली व जात होती. त्यामुळे अविज्ञानाचा प्रसार होतो आहे याची जाणीव आपल्याकडील प्रसारमाध्यमांनी नेहमी ठेवली पाहिजे. यात पहिली गोष्ट म्हणजे सुनामीमुळे आग लागली,’ असे सांगितले जात होते व आगीची दृश्ये दाखविली जात होती. काही प्रसारमाध्यमे टीआरपी वाढवण्यासाठी महाभारतातील ‘’नरोवा कुंजरोवा’’ अशा भाषेत बातम्या दाखवत असतात. पण अशा बातम्यांमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून जैतापूरसारख्या अत्यावश्यक प्रकल्पांबाबत विरोधाभास निर्माण होतो आहे.


अजून बरेच काही नमूद करण्यासारख आहे...तूर्तास एवढच...

-
राहुल

स्वर्ग- राहुल


नको मला हा मृगजळासारखा आभासी अवास्तव स्वर्ग,
आता सवय झाली आहे सुन्न रात्रींची अन् भक्कास दिवसांची...
नको पुन्हा ते फसव्या नात्यांचे श्वास गुदमरवणारे फास,
अन् त्यात स्वत्व गमावून पुनःपुन्हा गुरफटत जाणे...
राहू द्या मला नरकरूपी धगधगणाऱ्या पण लखलखत्या सत्यात,
तिथे ना काही गमावण्याची भीती आहे, ना विश्वासघात...
-
राहुल

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

बुधवार, १८ एप्रिल, २०१२