शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

निवडक व.पु. काळे

परिस्थिती बदलणारे आपण कोण ? गृहीत धरायची शक्ती एवढ्यासाठीच वाढवायची, त्यामुळे ’मन’ नावाची एक दुर्मिळ वस्तु सुरक्षित राहते. टवटवीत राहते. मन कोसळलं की माणूस कोसळला. मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसत खेळत नेता येतं. माणूस प्रथम मनाने खचतो, तसं झालं की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फ़क्त एवढंच करू शकतो की आपण आपला शब्द फ़िरवल्यामुळे दुस-याची होडी बुडणार नाही ना एवढीच काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.

पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मुल झालं म्हणजे बायको.................

"नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण ’ नाही ’ का म्हणत नाही? न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते, तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो."

एका क्षणामधे पत्नीची आई होते..... नवर्‍याने त्यानंतर पिता व्हाव ही पत्नीची अपेक्षा असते.पण तसं घडत नाही.
ह्याच कारण दिवस गेल्यापासून दिवस पुर्ण होईपर्यंत पत्नीने मातृत्वाचा एक छोटा कोर्स केलेला असतो... एकच विद्यार्थी असलेला वर्ग तिने नऊ महिने सांभाळलेला असतो. आई आणि मुल शाळेतच असतात आणि पुरुष शाळासोडुन अन्यत्र असतो . म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो.
त्यात शाळेला कायमच कंटाळलेला नवरा वाट्याला आला तर संसारामधे तो बिनखात्याचा मंत्री असतो..............

चैतन्याने बहरलेली फुलं आपण तोडतो आणि अचेतन मुर्तीवर वाहतो. आपल्याला सरळ सरळ चैतन्याची पूजा करताच येत नाही. स्वैराचार आणि स्वच्छंद यातला फरक समजला म्हणजे प्रेम ह्या शब्दाचाही अर्थ कळतो..

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..

जगायचं -- आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं --- म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत. केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला , तरी तो हवा , त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकटं आणि यातना , त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला मस्त बनवते , मस्तवाल बनवत नाही.

...........,जीवनावर , जगावर,जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं.उपमा द्यायचीच झाली तर मी विजेचीच उपमा देईन .पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली कि ती आकाशाचा त्याग करते ,पृथ्वीवर दगड होवून पडते ,पण पडण्यापासून स्वताला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करत नाही.प्रेम करताना माणसानंही असं तुटून प्रेम करावं.

व पु म्हणायचे "तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही.
ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्व आहे.गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होवून बसलंय. "

'राणी, प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा - देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात, म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.

"जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही."

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात.समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही.
उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या.आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची.स्वतःकडेच नीट पाहायचं.
'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे

एखाद्या प्रश्नाचं उत्तरं द्यायची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.

गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच.

ओळख वेगळी नि ओळखणं वेगळं....
ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो....
पण जवळची व्यक्ती कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळी वागते,
तेव्हा "ओळख" आणि "ओळखणं" यामधला खरा फरक समजतो.....
.
.
.
हातभर अंतरावर असलेली आणि जवळची वाटणारी व्यक्ती सुद्धा आपल्यापासून कितीतरी मैलो दूर आहे याची तेव्हा जाणीव होते


नाणी नेहेमी आवाज करतात पण नोटा आवाज करत नाहीत
म्हणून जेंव्हा तुमची किंमत वाढते तेंव्हा तुम्ही शांत राहिलं पाहिजे

लपून राहणं हा प्रकाशाचा गुणधर्म नाही.

रामाला दूर नेण्यापुरताच सुवर्णमृगाचा जन्म, सीतेला काय कमी होते ?
संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो ...

'आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.'

काळ हा माणसाचा शत्रू नव्हे . तो सर्वात जवळचा मित्र आहे.मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत , ताजा असतो.एखाद्या दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो ते तुमचा अंत पाहायला म्हणून नव्हे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून , तीव्रतेने भिडावं म्हणून !
जेवढी प्रतीक्षा मोठी , तेवढाच पूर्तीचा क्षण ज्वलंत , ताजा , उत्कट !

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

Awesome Sir,....every time i read i get new thngs.......