मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

सुरेश भट- कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!


– एल्गार, सुरेश भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: