दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन् हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन् असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी !
मी इथेच केली माझी सोसण्यात वारी !
’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा