जपानमध्ये वर्षभरात मिळणाऱ्या सरकारी सुट्ट्या तशा फार कमी (भारताच्या तुलनेत) असतात. आपल्याकडे जसा पितृ-पंधरवडा असतो, तसच काहीसं "ओबोन ओमात्सुरी" नावाने साजरा करतात. स्वतच्या पूर्वजांच्या गावी जाऊन त्यांची पूजा केली जाते.
याच सुट्टीच निमित्त साधून मागच्या आठवड्यात टोकियोला फिरायला गेलो होतो. जपानमध्ये येवून आता ५ वं वर्ष चालू आहे, पण टोकियो पाहण्याचा योग अगोदर कधी आला नव्हता. मित्रांसोबत फिरताना खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतीय दुतावासात झेंडा-वंदनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. योगायोग असा की त्याच दिवशी यासुकुनी श्राईन (जे भारतीय दुतावासाच्या अगदी जवळ आहे) परिसरात खूप गर्दी होती. नंतर लक्षात आलं की- याच दिवशी जपानने दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती पत्करली होती !! जपानमध्ये भारतीय लोकांची कमी नाही पण बहुतांश लोकं टोकियो-परिसरात राहतात. सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना गावी शाळेत असताना केलेल्या गोष्टींची खूप आठवण आली.
जपानमध्ये फिरताना जागोजागी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची मूर्ती पाहायला मिळते. त्यामागची कथा मात्र टोकियोमध्ये फिरताना पूर्णतः समजली (http://en.wikipedia.org/wiki/ Jiz%C5%8D). या मूर्त्यांना बौद्ध धर्मात क्षितीगर्भ (म्हणजेच बोधिसत्व) आणि जपानमध्ये ओ-जीझो-सामा या नावाने संबोधल जाते. अनाकलनीय भीती आणि शंकांवर मात करण्यासाठी आधाराच्या शोधात जगाच्या पाठीवर सगळेच असतात!
जगात सतत धावणाऱ्या शहरांपैकी एक असलेले टोकियो शहर सार्वजनिक सुट्ट्या असूनही सुट्टीवर नव्हत!!
-
राहुल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा