गुरुवार, १ मे, २०१४

अर्धवट स्वप्नांचा प्रवास

स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळायला योग्य वेळ यावी लागते, अन अशी वेळ जेव्हा येते ना, त्यावेळी कधी-कधी विश्वासच बसत नाही. आपण असेही वागू शकतो-हे पचनी पडायला वेळ द्यावा लागतो. अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात अनेक बदल होत असतात.

हरवलेल्या अन पुन्हा कधीही न सापडणाऱ्या काही स्वप्नांना आणि नात्यांना मन सतत आठवत असतं. माहित असतं कि आता काहीही परतून येणार नाहीये. या व्यवहारी आणि मायावी जगात देव (पावित्र्य) आणि देवत्व सांभाळण जितकं कठीण आहे, त्याहून अशा आठवणीतल्या नात्यांना (मन हलकं कराव म्हणून) उजाळा देताना योग्य व्यक्ती भेटणं महाकठीण आहे. देवतुल्य गुरुजन, जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, गावाकडे शाळेत असताना आजी-आजोबांचा जिव्हाळा....... 
ह्या आठवणी जीवन जगताना खूप प्रेरणा देतात. मनाला एक अकल्पित शक्ती आणि स्फूर्ती देत असतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्नं काही काळ मनाला छळणारचं!!! पण म्हणतातना- काळ हा सगळ्या जखमांवरील जालिम उपाय आहे. जसा-जसा काळ पुढे सरकतो, तसं अर्धवट छळणाऱ्या सुरवंठरूपी स्वनांचं बळ देणाऱ्या (विविध रंगाच्या छटा असणाऱ्या) फुलपाखरांरूपी आठवणींमध्ये रुपांतर होत असतं!! अर्धवट स्वप्नांचा असा होणारा प्रवास निश्चितच फार सुखकर असा नसतो...पण तो तसाच व्हायला हवा. वि. स. खांडेकरांच्या "अमृतवेल" कादंबरीतील तो परिच्छेद हाच समर्पक उपदेश देणारा आहे.
-
राहुल



1 टिप्पणी:

Prasad Vaidya म्हणाले...

खूप छान ब्लॉग आहे आपला, राहुलजी. कृपया आपला संपर्क क्रमांक मिळू शकेल का? शुभेच्छा. भेटू या.