सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

अद्यापही सु-याला- सुरेश भट


अद्यापही सु-याला माझा सराव नाही

अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता उठाव नाही

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मध्याला आता उपाव नाही

उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गान्दुलांचा भोंदू जमाव नाही

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

- गझलसम्राट सुरेश भट

दुभंगून जाता जाता- सुरेश भट


दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !

चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी !
मी इथेच केली माझी सोसण्यात वारी !
’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो