मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

गंध फुलांचा

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मीलन

सहज एकदा जाता जाता मिळुनि हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून

विरह संपता, मिलनाची अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन
-- पी सावळाराम

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

आम्ही- सुरेश भट


जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
- एल्गार, सुरेश भट

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

समिधा- कुसुमाग्रज (मराठी कविता)

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"